॥ श्री भक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ॥

कमालीचे जागृत असलेले सर्व धर्मियांचे ऐक्य देवस्थान परमश्रद्धास्थान परमकृपावंत परमेश्वरस्वरूप श्री दावल मलिक बाबासाहेब, शिवपुरी, ता. वाळवा, जि. सांगली यांच्या कृपाशिर्वादाने प्रगटलेला भक्तीशक्तीचा महान साक्षात्कार !

महाभक्तांच्या जीवनावरील महान भक्तिग्रंथ ह.भ.प. दिनकर विरचित.

॥ श्री भक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ॥

श्री दावल मलिक बाबांचे, संपूर्ण कृपापात्र, इटकरे गावाचे महान भक्तीयोगी कै. रंगरावस्वामी तथा रंगराव राऊसो महाडिक  यांची अलौकिक, आश्चर्यचकित करणाऱ्या दैवी घटनांनी परिपूर्ण अशी हृदयाचा ठाव घेणारी व मोठाच भक्तीलाभ घडवून देणारी, आरंभापासून अखरेपर्यंतची संपूर्ण भक्तीगाथा, बाबांची अगाध कृपाकथा !

श्री दावल मलिक बाबांचे परमभक्त कै. बंडूमामा ! आश्चर्याने थक्क करून सोडणाऱ्या त्यांच्या जीवनातील दैवी घटना वाचताना शरीराचे भान देखील उरणार नाही.  दिव्य साक्षात्कार !

आजवर अज्ञात असलेली श्री दावल मलिक बाबांची तेजोमय अवतारकथा! केवढा लाभ! ह.भ.प. दिनकरवर केवढी कृपा! नवलपूर्ण विश्वरूप दर्शन! काय आणि कोणत्या स्वरूपात ! श्रद्धेने वाचाच!! महावीरास कोणते रूपदर्शन! तांबोळींना शिखरस्थानी काय दिसले!

परमकृपावंत बाबांचे अनंत उपकार! दोन महाभक्तांना एकाच वेळी दर्शन ! बहाल काय केले! भक्तांनी काय मागून घेतले! भक्तीचा केवढा प्रताप या अगदी थोडया घटना. अशा किती तरी भान हरपून टाकणाऱ्या दिव्य दैवी घटना.

अनेक परमेश्वरस्यरूप दैवते आणि संत यांचे कृपाशिर्वाद लाभलेल्या या ग्रंथात त्यांची स्तुती स्त्रोत्रे आहेत. ग्रंथाचे पारायण करताना त्यांची नकळत भक्ती केल्याची पुण्यप्राप्ती . या परमेश्वरी ग्रंथाचे प्रत्येक पारायण आपणांस उत्तरोत्तर उच्च अध्यात्मिक पातळीवर नेत राहील. परमभक्तीचा लाभ घडून कळत नकळत आत्मोन्नतीच्या मार्गावर पुढे पुढे नेत राहील. सर्व धर्मातील सर्व क्षेत्रातील सर्वांनी भक्तीभावाने वाचून देवघरात ठेवलाच पाहिजे असा दिव्यभव्य पवित्र भक्ती ग्रंथ, अध्यात्म साधना करणाऱ्या भक्त, योगी, जपी, तपी, ज्ञानी, ध्यानी, वारकरी इ. सर्वांना हा ग्रंथ आत्मानंदाची मेजवानीच आहे. उपमा-विशेषणाच्या साह्याने या ग्रंथाचे अचूक वर्णन करणे कठिण आहे कारण या ग्रंथाचे दिव्यत्व त्याच्याही पलिकडचे आहे !

ह.भ.प. दिनकर विरचित ॥ श्री भक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ॥ ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या स्वग्रामी इटकरे (ता वाळवा ,जि सांगली) येथे श्री हनुमान मंदिरात मंगळवार ,दिनांक ०६ जानेवारी २००४ रोजी सकाळी १० वाजता  प्रा. डॉ. वि रा तोडकर यांचे हस्ते झाले. त्यावेळी भक्त भाविक ग्रामस्थ, रंगराव स्वामींचे समकालीन लोक, इतर मान्यवर, महिला ,बालके , युवक , सहकारी हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त परायण श्री धोंडी नाना पाटील होते . श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ,इटकरे चे तत्कालीन अध्यक्ष श्री शशिकांत शंकर गायकवाड आणि तत्कालीन उपाध्यक्ष श्री. आनंदा गोविंद पाटील हे निमंत्रक होते.

ते हे माझी माया तरले

ते हे माझी माया तरलेहा ब्रम्हीय दीक्षाप्राप्त भक्तियोगी ह. भ. प . दिनकर तथा  श्री. दिनकर रंगराव महाडीक यांनी श्रीमद गीता-ज्ञानेश्वरीवर अनेक ठिकाणी वेळोवेळी दिलेल्या शेकडो जाहीर प्रवचनांपैकी काही निवडक प्रवचनांचा अप्रतिम संग्रह तसेच भाग पहिला आहे. परमेश्वरी ज्ञानप्रकाश आहे .मानव जन्माच्या सार्थकतेसाठी, आत्मोद्धारासाठी, विशुद्ध अध्यात्मज्ञानाचे अत्यंत मूलगामी, चित्तवेधक प्रतिपादन  करणारी ही प्रवचने आपणास ज्ञानमार्गावर अंत:रंगीय ऊर्ध्वगामी भरारी घेण्यासाठी सहाय्य्यकारी ठरतील. कठीण विषयांवरील हे भाष्य अत्यंत सहज-सोप्या ओघवत्या भाषेत आहे. जागतिक स्तरावरील विविध धर्मीय प्राचीन-अर्वाचीन संत महात्म्यांच्या दृष्टांत कथांसह प्रतिपादित असणारी ही प्रवचने अध्यात्मज्ञानाचे अस्सल सौष्ठव प्राप्त केलेली दालने आहेत. भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेतून कालजयी ज्ञान खुले केले,त्याचे सुलभीकरण ज्ञानेश्वर माऊलींनी केले. त्याचाच यथार्थ या प्रवचनांद्वारे भाविकांसमोर उपलब्ध झाला आहे. परमेश्वर भक्ती मध्ये लीन भाविक संसार मार्गात असूनही कशाप्रकारे परब्रम्हप्राप्ती करू शकतात हे ‘ते हे माझी माया तरले’  या प्रवचनातून स्पष्ट केले आहे तर ‘श्रीराम तो मी’ या प्रवचनातून ज्ञानेश्वर माऊलींना अपेक्षित श्रीरामांच्या विभूतीचे तेजस्वी उन्नयन सादर केले आहे. मानवाच्या सर्व सुखांचे विश्रांती स्थान परमेश्वर हृदयात असताना भ्रांत माणसाची कामना विषयपभोगाकडे असते हे ‘ तैसा हृदयामध्ये मी रामु’  या प्रवचनात दाखवून दिले आहे. अशा वैविध्यपूर्ण आशयाने आणि संदर्भ बाहुल्याने या पुस्तकाची अर्थघनता वाढली आहे.

‘ते हे माझी माया तरले’  पुस्तकामध्ये समाविष्ट प्रवचने :

१) ते हे माझी माया तरले

२) ऊर्ध्वं गच्छंती सत्वस्था

३) श्रीराम तो मी

४) काम एष क्रोध एष

५) तैसा हृदयामध्ये मी रामु

६) तो आधी जरी दुराचारी

७) संभावितपणाचे ओझे जया

हरिभक्त परायण दिनकर यांच्या  श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचनांच्या ‘ते हे माझी माया तरले’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक २२/०४/२०२३ (अक्षय तृतीया) रोजी सौ. मंदाकिनी दिनकर महाडिक यांच्या हस्ते इटकरे येथे झाले.

'अमृतधारा' युट्युब चॅनेल

हरिभक्त परायण दिनकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी श्रीमद् भगवद्गीता ज्ञानेश्वरी वर जनसमुदायासमोर प्रवचने दिली. ही प्रवचने व्हिडिओ रुपात पुन्हा एकदा प्रसारित व्हावीत, असा एक विचार पुढे आला. सद्गुरु श्री दावल मलिक बाबा यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी अशा प्रकारे यूट्यूब चॅनेल द्वारे ही प्रवचने प्रसारित करावीत, त्यासाठी स्वीकृती दिली. अशा प्रकारे, दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी हरिभक्त परायण दिनकर यांनी आपल्या  ‘ अमृतधारा ‘ युट्युब चॅनेल वरून ‘ओम ध्यानम’  हा पहिला व्हिडिओ प्रसारित केला. त्यानंतर वेळोवेळी श्रीमद्भगवद्गीतेचे १८ अध्याय –  संस्कृत श्लोक व त्याच्या यथार्थ मराठी अनुवादासह – हरिभक्त परायण दिनकर यांच्या आवाजात प्रसारित करण्यात आले.

श्रीमद्गीता ज्ञानेश्वरी वरील अत्यंत आशय-अर्थ समृद्ध असणारी प्रवचने, श्री गुरुचरित्रावरील प्रवचने, श्री शिवलीलामृतावरील प्रवचने प्रसारित करण्यात आली, येत आहेत. सुप्रसिद्ध स्तोत्रांचे यथार्थ मराठी अनुवाद सुद्धा हरिभक्त परायण दिनकर यांच्या आवाजात प्रसारित करण्यात आले ,येत आहेत. श्री ज्येष्ठा गौरी पूजाविधीचा समावेश चॅनेल वर करण्यात आला आहे. ‘श्रावण सोमवार विशेष ‘ म्हणून संत कवी श्रीधर स्वामी विरचित श्री शिवलीलामृत ग्रंथातील निवडक ‘श्री शिवस्तुतीपर ओव्या’  त्यांच्या मराठी अर्थासहित प्रसारित करण्यात आल्या. संत एकनाथ महाराज निर्मित श्री गुरुदेव दत्त आरती मराठी निरूपणासह प्रसारित करण्यात आली. संत तुलसीदास कृत हनुमान चालीसा, महर्षी बुधकौशिक निर्मित श्री रामरक्षा स्तोत्र, आदि शंकराचार्य कृत श्री पांडुरंगाष्टकम, श्रीमद वल्लभाचार्य कृत मधुराष्टकम , अथर्वण ऋषिकृत श्री गणपत्यथर्वशीर्ष, श्री मार्कंडेय पुराणोक्त अर्गला स्तोत्रम्, श्री इंद्रकृत श्री महालक्ष्मी अष्टकम, श्री नारदपुराणे संकष्टनाशनम नाम श्री गणपतीस्तोत्रम् इत्यादी सुप्रसिद्ध स्तोत्रे त्यांच्या मराठी अनुवादासहित प्रसारित करण्यात आली आहेत. असाच विश्वासार्ह ,यथार्थ भक्तीरसांनी ओथंबलेला व्हिडिओ सांभार अमृतधारा चॅनेल वरून प्रसारित करण्यात येणारच आहे. भाविक भक्तांना ही एक अमूल्य देणगीच आहे.

हरिभक्त परायण दिनकर यांची प्रवचने

हरिभक्त परायण दिनकर यांनी वेळोवेळी अनेक ठिकाणी अध्यात्मशास्त्रावर दिलेली प्रवचने ही त्यांच्या स्वतःच्या अध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू तर आहेतच, शिवाय अस्सल अध्यात्मशास्त्राचा एक अत्यंत मौलिक ठेवा आहे. श्रीमद् भगवद्गीता ज्ञानेश्वरी , श्री गुरुचरित्र, श्री शिवलीलामृत अशा अत्यंत महत्त्वाच्या लोकप्रिय आणि समाजमन व्यापून टाकणाऱ्या ग्रंथातील ज्ञान आपल्या प्रवचनांद्वारे हरिभक्त परायण दिनकर यांनी जनसमुदायासमोर अविष्कृत केले आहे. विशेषतः श्रीमद्गीता ज्ञानेश्वरीवर त्यांनी दिलेली प्रवचने प्रचंड लोकप्रिय होत असत ,होत आहेत . या प्रवचनांच्या विषयी आपल्या ‘ ते हे माझी माया तरले ‘ या पुस्तकाच्या निवेदनात हरिभक्त परायण दिनकर यांनी खालील प्रमाणे नमूद केले आहे.

‘एखाद्या गावच्या भक्त-मंडळींनी, माझी मान्यता घेऊन, पारायण सप्ताहात माझे प्रवचन आयोजित केले की मी ज्या श्लोक-ओवींवर प्रवचन देण्याचे निश्चित करीन, त्यावर ध्यान लावून परब्रह्माकडून प्रथम मंजुरी घेत असे. त्यानंतर त्याचे प्राथमिक लेखन करीत असे. दोन-तीन दिवस हे ब्राह्म-मुहूर्तावर माझ्या परमात्म्याच्या नित्य पूजनानंतर करीत असे. ज्या दिवशी ते प्रवचन द्यायचे, त्याच दिवशी त्याचे लेखन सकाळीच पूर्ण झालेले असायचे. ध्यानयोगाद्वारे परमात्म्याकडून त्यांची अंतिम मंजुरी घेत असे. त्यावर त्याच दिवशी दिनांकांकित सही करीत असे. मग सायंकाळी नियोजित वेळेवर ते प्रवचन, मंजुरीचे कागद बरोबर न नेताच देत असे व ते भक्तजनांना अतिशय आवडत असे. प्रथम कागदावर लिखाण केल्याने कोठे काय बोललो, हे लिखित स्वरूपात राहत असे. त्यानंतर ते कागद फाईल केले जात असत. अशा रीतीने दिलेली प्रवचने संग्रहित होत गेली ‘

हरिभक्त परायण दिनकर यांचे वडील ब्रह्मीभूत हरिभक्त परायण रंगरावस्वामी यांचे जीवन ज्ञानेश्वरीमयच होऊन गेले होते. त्यांच्या समाधीस्त होण्यानंतर हरिभक्त परायण दिनकर यांना जे साक्षात्कार श्रीमद्गीता ज्ञानेश्वरी संदर्भात मिळाले,  त्यामुळे त्यांचे जीवनही ज्ञानेश्वरीमयच होऊन गेले. हरिभक्त परायण दिनकर विरचित ‘ श्री भक्ती श्रीहरीप्राप्ती मुक्ती ‘  ग्रंथात दहाव्या अध्यायात तीन खास ओव्यात श्रीमद ज्ञानेश्वरी ची महती त्यांनी गायली आहे. श्रीमद्गीता ज्ञानेश्वरीवर प्रवचन देण्याचा अधिकार संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनीच हरिभक्त परायण दिनकर यांना दिला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचे संस्कृतबद्ध असे महान ज्ञान जनसामान्यांना समजावे म्हणून ते प्राकृत मराठीत ओवीबद्ध रूपात श्रीमद ज्ञानेश्वरीच्या रूपाने साकार केले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे भक्त असलेले हरिभक्त परायण दिनकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या श्रीमद ज्ञानेश्वरीतील ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्याच आशीर्वादाने प्रवचनांच्या स्वरूपात जनसमुदायासमोर मांडले.

सर्वधर्मीय संत महात्म्यांच्या उल्लेख आणि ज्ञानाने समृद्घ अशी ही वैशिष्ट्यपूर्ण प्रवचने अध्यात्मशास्त्रातील सर्व प्रवाहांना समाविष्ट करून घेतात. किंबहुना, सर्व संत सज्जन महात्म्यांनी हरिभक्त परायण दिनकर यांना या ज्ञानाचा समावेश आपल्या प्रवचनांमध्ये करण्यासाठी अनुमतीच दिलेली आहे.  प्रत्यक्ष शेकडोंच्या जनसमुदाया समोर दिलेली प्रवचने ही तर ज्ञात आहेतच, परंतु बऱ्याचदा घरी येणाऱ्या मित्रपरिवार भाविक भक्त, जिज्ञासू ,नातेवाईक यांच्याशी सहज वार्ता करत असताना हरिभक्त परायण दिनकर यांनी अध्यात्मशास्त्रावर केलेले सहज निरूपण हे सुद्धा एखाद्या प्रवचन सेवेइतकेच व्याप्त होऊन राहत असे.

हरिभक्त परायण दिनकर यांना विविध अखंड हरिनाम सप्ताह, सामुदायिक पारायण सोहळे यामध्ये प्रवचन सेवेसाठी सतत निमंत्रण येत असत. त्यांच्या प्रवचनांचे श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध होत असत . काहीतरी अलौकिक श्रवण केल्याचा त्यांना प्रत्यय येत असे. शासकीय सेवेतील कर्तव्य बजावत असताना हरिभक्त परायण दिनकर यांनी ही प्रवचने दिली आहेत. प्रवचन सेवेनंतर त्यांनी कोणत्याही स्वरूपात मानधन घेतलेले नाही. ईश सेवेसाठी आणि जनसेवाहितार्थ हे सर्व कार्य त्यांनी अमानित्व भावाने केले आहे.

श्रीमद्गीता ज्ञानेश्वरी वरील हरिभक्त परायण दिनकर यांची काही लोकप्रिय, समृद्ध प्रवचने : –

१) ते हे माझी माया तरले

२) संभावितपणाचे ओझे जया

३) श्रीराम तो मी

४) काम एष क्रोध एष

५) तो आधी जरी दुराचारी

६) तैसा हृदयामध्ये मी रामु

७) ऊर्ध्वं गच्छंती सत्वस्था

८) इये मृत्युलोकीचे उफराटे

९) यदा यदा हि धर्मस्य

१०) जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे

११) मग मीच होऊनी दिवटा

१२) चतुर्विधा भजंते मां जना:

१३) अक्षरब्रह्मयोग

१४) म्हणोनि विश्वरुपलाभे श्लाघ

१५) जे हे सात्विक श्रध्दा

१६) सततं किर्तयंतो मां

१७) तेषामहं समुद्घर्ता

१८) जन्म मृत्यू जरा व्याधी

१९) यत्र योगेश्वर: कृष्णो

२०) जय जय देव निर्मळ

२१) तैसी संसारा या समस्ता

२२) अगा मानस हे एक

२३) दैवी संपद्वीमोक्षाय निबंधायासुरी मता

२४) जय जय ज्ञानेश्वरा

२५) ते साद्यंतचि जाण दुःख

२६) हे विश्वचि माझे घर

२७) उपजे ते नाशे

२८) ते एकचि बुध्दी पाही

२९) हा विचारूनि अहंकार सांडिजे

३०) तू मन हे मिची करी

३१) तस्मात्सर्वेषु कालेषु

३२) अज्ञश्चाश्रध्दधानश्च संशयात्मा विनश्यति

३३) याकारणे गा तुवा इया

३४) तेचि मी योगयुक्त।परम मानी

३५) तया अहं वाचा चित्त आंग

३६) वाचावी श्रीमद् गीता-ज्ञानेश्वरी

३७) आता विश्वात्मके देवे।।(पसायदान)